Ad will apear here
Next
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेद काय सांगतो?
फोटो : प्रातिनिधिक

आयुर्वेदामध्ये ‘करोना’चे वर्णन आहे का, असा प्रश्न केला जातो. परंतु आजाराच्या नावाला महत्त्व नसून, तो कोणत्या परिस्थितीत, कोणत्या कारणाने होतो, त्रिदोषांपैकी कशावर त्याचा परिणाम होतो, हे आयुर्वेदात पाहिले जाते. आयुर्वेदात जास्त भर हा ‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं’ यावर दिला आहे. म्हणजेच आहार-विहार, औषधी माध्यमातून आरोग्य निरामय कसे राहील आणि रोगप्रतिकारशक्ती कशी वाढेल, या दृष्टीने आयुर्वेदात विचार केलेला आहे. ‘करोना’चा संसर्ग होणाऱ्यांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील वैद्य मनोज मधुकर देशपांडे यांनी, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या अशा काही गोष्टींचे मार्गदर्शन या लेखातून केले आहे, की ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकेल.
.........
सर्व जगात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूच्या संसर्गामुळे कोव्हिड-१९ या रोगाच्या साथीने कहर केला आहे. त्याची कारणे, स्वच्छतेचे उपाय, संख्याशास्त्र, चिकित्सा इत्यादींविषयी विविध माध्यमांमधून आपणाला माहिती मिळतच आहे. त्यामुळे त्याची इथे चर्चा करणार नाही.

खूप लहान मुले, वयस्कर मंडळी, गर्भिणी, इतर गंभीर आजाराने ग्रस्त लोक, कमी प्रतिकारशक्तीचे लोक यामध्ये बळी पडत आहेत. स्वच्छता, विलगीकरण आदींच्या बाबतीत जेवढी जागरूकता निर्माण केली जात आहे, तेवढा भर प्रतिकारशक्ती चांगली राहण्याच्या उपायांवर दिला जात नाही. त्या दृष्टीने जागरूकतेसाठी हा लेख लिहिला आहे.

आयुर्वेद या आपल्या प्राचीन वैद्यकशास्त्रामध्ये जास्त भर हा ‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं’ यावर दिला आहे. आहारविहार, औषधी या रूपाने उत्तम निरामय आरोग्य आणि व्याधिक्षमत्व यासाठी असंख्य उपाय सांगितलेले आहेत. हे सर्व उपाय अत्यंत सुरक्षित व प्रभावी आहेत.

आयुर्वेदामध्ये ‘करोना’चे वर्णन आहे का, असा प्रश्न केला जातो. परंतु आजाराच्या नावाला महत्त्व नसून, तो आजार कोणत्या कारणाने, कोणत्या परिस्थितीत होतो, या आजाराने शरीरातील वात-पित्त-कफ या त्रिदोषांपैकी कोणत्या दोषांवर त्याचा परिणाम होतो, हे पाहून त्याची संप्राप्ती (पॅथोलॉजी) समजली जाते व त्याला अनुरूप उपाययोजना केली जाते. सध्याच्या साथीतील रोगाचा परिणाम हा घसा, फुफ्फुस, पूर्ण श्वसनसंस्था यावर होताना दिसतो. हे सर्व भाग कफ या दोषाच्या व्यक्ततेची प्रमुख स्थाने होत. म्हणून कफप्रकोप किंवा कफदोष दुष्टी वाढल्यास आपण या व्याधीने ग्रस्त होण्याची शक्यता वाढू शकते हे आपण समजू शकतो. अशा वेळी कफदोष वाढू न देणे हे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासारखेच आहे. 

वाढलेला कफदोष हा पुढील श्वसनासंबंधीच्या व्याधींना जणू इंधन म्हणूनच काम करू शकतो. सध्याचा वसंत ऋतू हा कफवृद्धीला आणखीच पूरक ठरत असतो. कफदोष प्रमाणापेक्षा वाढू नये व वात-पित्त-कफ हे दोष संतुलित राहणे या दृष्टिकोनाने या लेखात उपाय सुचविलेले आहेत.

आपला अग्नी (अन्नपचन व त्याचे सर्व शरीर घटकात रूपांतर करणारी यंत्रणा) चांगला असणे हेसुद्धा निरोगी स्थितीसाठी आवश्यक असते. या दृष्टीनेही या लेखात विवेचन केले आहे. आपली दिनचर्या, ऋतुचर्या या गोष्टीही व्याधिक्षमत्व आणि शरीरांतर्गत बल टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असतात. चला तर मग, समजून घेऊ या उठल्यापासून झोपेपर्यंतच्या अशा गोष्टी ज्या आपले व्याधिक्षमत्व वाढवण्यासाठी मदत करतील.

मंजन : त्रिफळा चूर्णाने हिरड्यांना मंजन करावे.

गंडूष : कोमट पाणी/कोमट पाणी+हळद/कोमट पाणी+त्रिफळा याने गुळण्या (gargle) करणे.

नस्य : दोन्ही नाकपुड्यांमध्ये सकाळी करंगळीने तीन-चार थेंब तेल सोडणे.

अभ्यंग : सर्वांगाला रोज तेलाने मालिश करणे. सर्वांगाला जमत नसेल, तर आलटून-पालटून ठराविक भागाला मालिश करणे.



व्यायाम :
मध्यम तीव्रतेने करणे. सूर्यनमस्कार-skipping-जॉगिंग-योगासने करणे, रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यावश्यक.

प्राणायाम : फुफ्फुस, हृदय, श्वसनसंस्था, रोगप्रतिकारशक्ती, चिंता-नैराश्य-भीती यांचे नियंत्रण, म्हणजेच शारीरिक व विशेषतः मानसिक स्वास्थ्यासाठी प्राणायाम अतीव उपयुक्त.

उद्वर्तन : त्रिफळा, नागरमोथा, लोध्र अशा वनस्पतींच्या चूर्णाने बनवलेले उटणे (उद्वर्तन) सर्वांगाला लावून गरम पाण्याने आंघोळ करणे.

निद्रा : दिवसा झोप व रात्री जागरण हे दोन्ही त्याज्य.

भीती/चिंता मुक्ती : ध्यान, नामस्मरण, प्राणायाम, प्रेरणादायी वाचन व श्रवण. 

काय खावे, काय खाऊ नये?

दूध : दूध व दुधाचे सर्व पदार्थ टाळावेत (चहापुरते थोडे दूध, घरचे तूप चालेल.)

पाणी : गरजेपेक्षा जास्त पाणी, थंड पाणी, जास्त पाणीदार पदार्थ नको.

जड पदार्थ : मिठाई, तळलेले पदार्थ नकोत.

विरुद्ध आहार : दूध+फळे किंवा मांसाहार +दुग्धजन्य पदार्थ अशा प्रकारचा विरुद्ध आहार नको.

अध्यशन : भूक नसताना खाणे, अति खाणे, वेळी-अवेळी खाणे टाळावे.

धान्य : दिवसातून एका वेळेस तरी गव्हाऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा उपयोग करावा.

भाज्या : पडवळ, कारले, मेथी, मुळा, शेवगा, काटेरी वांगे, कांदा, लसूण इत्यादी कडू, तुरट, तिखट अशा कफघ्न, रसयुक्त भाज्यांचा समावेश आहारात जरूर करावा.

कडधान्ये : मूग, हुलगे (कुळीथ), सोयाबीन, सातूचे पीठ यांचा वापर जास्त करावा.

चटण्या : जवस, कारळे, खोबरे, लसूण यांच्या चटण्या वापराव्या.

सुका मेवा : जर्दाळू, खारीक, मनुका, बदाम, अक्रोड, खोबरे इत्यादींचा वापर करावा.


फोटो : प्रातिनिधिक

चहा :
ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी यांचा भरपूर आले किंवा गवती चहा घालून वापर करावा.

मीठ : नेहमीच्या मिठापेक्षा सैंधव (शेंदेलोण) वापरावे.

मध : रोज एक ते दोन चमचे खात्रीचा मध जरूर खावा. याने विशेषतः घशातील संसर्ग होण्यास अटकाव होतो.

लाह्या : ज्वारी, गहू, नाचणी, राजगिरा, सोयाबीन, मका इत्यादींच्या लाह्या वेगवेगळ्या स्वरूपात वापराव्यात.

भाजणी : थालीपीठ स्वरूपात आहारात समावेश ठेवावा.

गूळ : साखरेऐवजी सेंद्रिय गूळ वापरावा.

सिद्ध जल : सुंठ सिद्ध/सुवर्णसिद्ध जल/ उकळून थोडे आटवलेले पाणी पिणे.

मुखशुद्धी : भोजनोत्तर बडीशेप +लवंग चावून खाणे/ कोणताही गोड पदार्थ न घालता बनवलेले तांबूल (पान) सेवन करणे.
भोजनोत्तर शतपावली करणे.

लंघन : हलका, कमी आहार घेणे. याने शरीरातील संचित टॉक्सिन्स पचविण्यास संधी मिळते.

सद्वृत्त पालन : जनपदोध्वंस (साथींचे मोठे आजार) टाळण्यासाठी आचार्य चरक यांनी सांगितलेला उपाय होय. अनेक कट्टर विज्ञानवादी लोकांना सद्वृत्त पालन, श्रद्धा, प्रार्थना या गोष्टी निरर्थक वाटतात; पण विज्ञानाने विवेक गमावला तर ते कसे मनुष्यजातीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरेल ह्याचे आदर्श उदाहरण म्हणजे ही साथ होय. जैविक अस्त्रांची निर्मिती अथवा जिव्हालौल्यासाठी असंख्य प्राण्यांची कत्तल हा विज्ञानाचा अविवेक नाही का? म्हणूनच विवेकवादी विज्ञान ही काळाची गरज आहे.

हात वारंवार साबणाने धुणे, जनसंपर्क पूर्णपणे टाळणे या गोष्टी करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, हे विसरून चालणार नाही.

या उपरोक्त गोष्टी सांभाळणे फार कठीण नाही हे मी स्वानुभवाने सांगतो. या साथीचे गांभीर्य पाहिले, तर या गोष्टी कठीण वाटायचे कारण नाही. बरं, होम क्वारंटाइनमुळे आपल्याला वेळही तसा बराच आहे, हो की नाही?

- वैद्य मनोज मधुकर देशपांडे
(कल्पतरू आयुर्वेदीय चिकित्सालय, पुणे)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZMUCK
Similar Posts
करोनाला गांभीर्याने घ्या : डॉ. अविनाश भोंडवे (मार्गदर्शनपर व्हिडिओ) पुणे : ‘विविध माध्यमांतून सर्वत्र करोनाविषयक माहिती उपलब्ध होत असूनही, अजूनही बरेचसे लोक सुरक्षेचे उपाय पाळताना दिसत नाहीत,’ याबद्दल खंत व्यक्त करून ‘करोनाला गांभीर्याने घ्या,’ असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले. पुण्यातील ‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने
पी हळद (दूध), वाढव प्रतिकारशक्ती ‘पी हळद हो गोरी’ ही म्हण मागे पडून ‘पी हळद (दूध), वाढव प्रतिकारशक्ती’ अशी नवी म्हण करोनाच्या काळात व करोना-उत्तरकाळात रूढ करावी लागेल अशी लक्षणं आता दिसू लागली आहेत. आयुर्वेदात सर्व रोगांसाठी सर्वांना खात्रीशीर लागू पडणारा व प्रतिकारशक्ती वाढवणारा एकच रामबाण उपाय नसतो. रुग्णाच्या वयापासून अनेक घटक लक्षात घेऊन औषधयोजना केली जाते
करोना काळातही निर्भयपणे काम करणारे पुण्यातील ज्येष्ठ डॉक्टर दिलीप देवधर यांचे अनुभव माझ्यासारखा एक सामान्य फॅमिली डॉक्टर गेल्या चार महिन्यांपासून जे काही चालले आहे हे चुकीचे चालले आहे, हे सातत्याने सांगत आहे; पण इपिडेमिक अॅक्टप्रमाणे आम्ही डॉक्टर सरकारच्या निर्णयाविरुद्ध बोलू शकत नाही. म्हणून आपण आपल्या अनुभवाप्रमाणे व ‘प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन’च्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आचरणात आणायचे ठरविले
करोना विषाणू : ‘हे’ शास्त्रीय मुद्दे तुम्हाला माहिती आहेत का? करोना विषाणूमुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ (COVID-19) असे त्याचे नामकरण केले असून, जगभर त्याची साथ असल्याचे (पँडेमिक) जाहीर केले आहे. ही परिस्थिती काळजी वाटण्यासारखी आहे; मात्र सोशल मीडियासह अनेक माध्यमांतून ऐकीव किंवा अशास्त्रीय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language